पुणे : पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत लाचखोर महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. घोटावडे येथील मंडल अधिकारी रोहिणी शशांक गुप्ते (वय 57 वर्ष, रा. सदाशिव पेठ, पुणे) यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मोजे केमसेवाडी येथील खरेदी केलेल्या जमिनीच्या दोन नोंदी 7/12 व फेरफार उताऱ्यावर घेण्यासाठी अर्ज केला होता. हे काम करून देण्यासाठी मंडल अधिकारी रोहिणी गुप्ते यांनी स्वतःसाठी आणि तलाठी यांच्यासाठी मिळून प्रत्येक नोंदीचे 10 हजार रुपये, असे एकूण 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी मोबाईलवरून केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी 24 जुलै 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी 28 जुलै 2026 रोजी सापळा रचून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी अधिकारी रोहिणी गुप्ते यांनी पंचांसमक्ष स्वतःसाठी 5,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

या पडताळणीनंतर 12 नोव्हेंबर 2026 रोजी पौड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र. 342/2026, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपी महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून, सूर्यास्तानंतर अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि पोलीस उप अधीक्षक सतिश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, अशोक गवारी व त्यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (दूरध्वनी: 020-26132802 / टोला फ्री क्र. 1064) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






