उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन-आष्टापूर या वर्दळीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला बेदरकारपणे उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने चाळीस वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (ता. 12) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

दीपक बाळू कांचन (वय अंदाजे 40, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत दीपक बाळू कांचन हे गुरुवारी रात्री आपल्या दुचाकीवरून उरुळी कांचन बाजूकडून भवरापूरच्या दिशेने निघाले होते. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी कोरेगाव मूळ हद्दीतील गोळीबार मैदान परिसरात आली असता, या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उसाने भरलेला एक ट्रेलर (ट्रॉली) अंधारात उभा होता.

रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्याने आणि उभ्या असलेल्या ट्रॉलीचा अंदाज न आल्याने दीपक यांना अगदी जवळ आल्यावर ट्रॉली दिसली. अचानक समोर ट्रॉली दिसल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची दुचाकी अत्यंत वेगाने जाऊन उसाच्या ट्रेलरला पाठीमागून धडकली. धडक इतकी भीषण होती की, दीपक यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत होऊन ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. भवरापूरचे माजी सरपंच सचिन सातव व स्थानिक ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ कदम रुग्णवाहिकेचे वैजीनाथ कदम यांच्याशी संपर्क साधून अपघातग्रस्त दीपक यांना तातडीने उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आणि गंभीर मार लागल्याने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
विना-रिफ्लेक्टर आणि बेदरकार ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर!
सध्या ऊस गळीत हंगाम सुरू असल्याने आष्टापूर, कोरेगाव मूळ, भावरापूर आणि उरुळी कांचन परिसरात रात्रंदिवस उसाच्या ट्रॉली आणि ट्रॅक्टरची मोठी वर्दळ सुरू आहे. अनेक ट्रॉलींना पाठीमागे रिफ्लेक्टर किंवा इंडिकेटर नसतात, तसेच चालक रस्त्याच्या कडेला व वळणांवर धोकादायक पद्धतीने वाहने उभी करून ठेवतात. याच निष्काळजीपणामुळे दीपक कांचन यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.






