यवत, (पुणे) : वडीलधाऱ्यांच्या जमिनीच्या वाटणीवरून 28 वर्षीय तरुणावर त्याच्याच सख्ख्या काकाने आणि चुलत पुतण्याने मिळून ऊस तोडण्याच्या कोयत्याने व नारळाच्या लाकडाने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटस (ता. दौंड) हद्दीतील ठोंबरेवस्ती परिसरात मंगळवारी (ता. 23) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक ज्ञानदेव ठोंबरे (वय 28, रा. पाटस ठोंबरेवस्ती, ता. दौंड)असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबबत विवेक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दत्तात्रय बाबुराव ठोंबरे आणि श्रेयश आबा ठोंबरे (दोन्ही रा. पाटस ठोंबरेवस्ती, ता. दौंड) या दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक ठोंबरे हे शेती करतात. त्यांच्या घराशेजारीच त्यांचे चुलते दत्तात्रय ठोंबरे हे राहतात. वडीलोपार्जित जागेच्या वाटपावरून चुलते दत्तात्रय हे विवेक आणि त्यांच्या कुटुंबाशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद घालत असत. मंगळवारी (ता. 23) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विवेक ठोंबरे हे जनावरांच्या गोठ्यात गाईची धार काढत होते.
गोठ्यापासून काही अंतरावर चुलते दत्तात्रय ठोंबरे आणि त्यांचा नातू श्रेयश यांचा आपसात काहीतरी वाद सुरू होता. विवेक केवळ तिथे काय सुरू आहे हे पाहण्यासाठी जवळ गेले असता, श्रेयश ठोंबरे विवेकला म्हणाला, “तू माझ्याकडे का बघतोस, तुला टपूत पाडू का?” विवेक यांनी “तू मला असा का बोलतोस?” असे विचारताच, श्रेयशने थेट हातातील ऊसतोडीचा धारदार कोयता विवेक यांच्यावर चालवला.
दरम्यान, श्रेयशने मारलेला कोयता विवेक यांनी हाताने अडवण्याचा प्रयत्न केला असता, तो थेट त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर बसला आणि अंगठा गंभीर जखमी झाला. विवेक कोयता धरून ठेवत असतानाच, पाठीमागून चुलते दत्तात्रय ठोंबरे हे हातात नारळाचे कडक लाकूड घेऊन धावून आले. त्यांनी विवेक यांच्या मानेवर आणि दोन्ही हातांवर बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.







