पुणे: पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम ठेकेदाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठरल्याप्रमाणे स्लॅबचे काम पूर्ण करूनही स्लॅबसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी प्लेट आणि लाकडी बांबू काढू न दिल्याने त्यांचे भाडे वाढत गेले. त्याचबरोबर अतिरिक्त काम करण्यासाठी दबाव आणि धमक्या दिल्याने मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे ठेकेदाराने गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी बंगला मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानोबा श्रीहरी वांजळे (वय 54) असे मृत ठेकेदाराचे नाव असून, त्यांचे पुत्र श्रीरंग वांजळे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष उभे (रा. कोंढुर, ता. मुळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानोबा वांजळे यांनी संतोष उभे यांच्या बंगल्याचे स्लॅब टाकण्याचे काम दीड लाख रुपयांत स्वीकारले होते. या कामासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी प्लेट आणि लाकडी बांबू त्यांनी भाड्याने आणले होते. स्लॅबचे काम पूर्ण झाल्यानंतरही बंगला मालकाने हे साहित्य काढून नेण्यास परवानगी दिली नाही.
तक्रारीनुसार, ठरलेल्या कराराबाहेरील अतिरिक्त काम त्याच रकमेत करून देण्यासाठी ज्ञानोबा वांजळे यांच्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच, “तुला बघून घेतो, यापुढे कुठेच काम मिळू देणार नाही, तुझी पोलिसांत तक्रार करतो,” अशा धमक्या देत त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. लोखंडी प्लेट आणि लाकडी बांबू काढण्यास विरोध झाल्याने त्यांचे भाडे दिवसेंदिवस वाढत गेले आणि आर्थिक ताणही वाढला.
या मानसिक तणावातून ज्ञानोबा वांजळे यांनी 18 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. त्याच्या आधारे उत्तमनगर पोलिसांनी संबंधित बंगला मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.







