पुणे: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी (२३ जुलै) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातही बंद पाळण्यात येणार असून, पालकांनी आपल्या पाल्यांना शाळा आणि महाविद्यालयात पाठवू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे आणि युवक आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या बंदला आतापर्यंत ३० हून अधिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

या बंदमध्ये विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग तसेच समविचारी राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर लक्ष्मी रस्ता आणि भवानी पेठ मार्गे मोर्चा काढण्यात येईल. या मोर्चाचा समारोप पुणे रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे.






