पुणे: पुणे शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात लागू करण्यात आलेली नाही. पुणे महानगरपालिकेकडून शहराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांना नियोजित वेळेनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील सर्व भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा केला जात आहे. वितरण यंत्रणेचा नियमित आढावा घेतला जात असून, कुठेही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करण्यासाठी संबंधित विभाग कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अनावश्यक चिंता करण्याचे कारण नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

सध्या सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पाणीकपातीबाबत विविध अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले. अधिकृत माहिती केवळ महानगरपालिकेकडूनच जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नागरिकांनी पाण्याचा वापर गरजेनुसार आणि जबाबदारीने करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पाण्याची बचत करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे महापौरांनी नमूद केले. शहराला अखंड आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून, सध्याच्या परिस्थितीत पाणीकपात लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत 20.16 टीएमसी म्हणजेच 69.17 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत 23.11 टीएमसी (79.28 टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 2.95 टीएमसीने पाणीसाठा कमी असला, तरी सध्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.






