पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय समोर आला आहे. आयोगाने आगामी काळातील सर्व संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा संगणक प्रणालीद्वारे म्हणजेच ऑनलाइन (CBT) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आणि त्यांच्या विविध मागण्या लक्षात घेता, हा निर्णय जुलै 2027 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत शुद्धिपत्रक आयोगाने प्रसिद्ध केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी आणि विविध संघटन संघटना ऑनलाइन परीक्षा पद्धतीवर सातत्याने आक्षेप घेत होत्या. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा केंद्रांची उणीव, इंटरनेटची अपुरी कनेक्टिव्हिटी आणि संगणकावर परीक्षा देण्याचा सराव नसणे यांसारख्या अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती होती. विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने हा निर्णय तात्पुरता मागे घेतला आहे.

या ताज्या निर्णयानुसार, आता आगामी काळात होणाऱ्या सर्व एमपीएससी पूर्व परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक म्हणजेच ओएमआर (OMR) शीटच्या माध्यमातून ऑफलाइन पद्धतीनेच घेतल्या जातील. याआधी 25 जून 2026 रोजीच्या अधिसूचनेनुसार वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले होते, परंतु आता तो निर्णय 2027 पर्यंत स्थगित करण्यात आला आहे.






