संतोष पवार

इंदापूर: आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त पळसदेव ता . इंदापूर येथील पळसनाथ शिक्षण संकुलातील विद्यार्थी वारकऱ्यांचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला . वारकरी मूल्ये व संप्रदायाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये भक्तीभाव रुजावा याकरिता या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभुषा परिधान करून उपस्थित होते. टाळ मृदुंगाचा गजर, रामकृष्ण हरी, श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामाच्या उद्घोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाईच्या वेशातील वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या बालिका, हातात भगवी पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले विद्यार्थी वारकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल रुक्मिणीच्या सजवलेल्या पालखीने हरिनामाचा गजर करीत गावातील मुख्य बाजारपेठेतून गावातील असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश केला.
त्याठिकाणी भजन नामस्मरण पुजाअर्चा करण्यात आली. हरिपाठ ,गवळणी अभंग आणि भजनाचे सादरीकरण करत विद्यार्थी वारकऱ्यांनी यावेळी फुगडीचा आनंद घेतला . संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या अखंड गजराने टाळ मृदंगाच्या निनादाने आणि अभंगाच्या सुरेल स्वरांनी दुमदुमून गेला. सामाजिक व सांस्कृतिक जाणिव आणि ऐक्य भावनेचा संदेश देणाऱ्या या दिंडीसोहळ्यात सहभागी विद्यार्थी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
भक्ती संस्कृती, वाचन संस्कार आणि वारकरी परंपरेचा सुंदर मिलाफ या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. यावेळी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांना शिक्षण संस्थेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे सचिव योगिराज काळे, संजय शेलार, विलास काळे, देविदास बांडे, बाळासाहेब हिंगमिरे, सखाराम खोत ,अंकुश काळे, चंद्रकांत खत्री यासंह ग्रामस्थ पालक, प्राचार्य पर्यवेक्षक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .







