कल्याण: कल्याणमधील बेपत्ता झालेल्या शिक्षिका संगीता चंदनशिवे यांच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखेला यश आले आहे. अनेक वर्षांपासून परिचित असलेल्या व्यक्तीने मालमत्तेच्या वादातून तीन साथीदारांच्या मदतीने त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, एका आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जुलै रोजी कल्याण पश्चिमेतील मोरे परिसरात राहणाऱ्या संगीता चंदनशिवे या नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर आसनगाव येथे एलआयसीच्या कामानिमित्त जाणार असल्याचे त्यांनी काही नातेवाईकांना सांगितले होते. मात्र त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

चार दिवसांनंतर घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ संगीता चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाला हत्येचे वळण मिळाले.
तपासादरम्यान मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर घोटी परिसरात पैसे काढण्यासाठी झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
तपासात गोकुळ आव्हाड हा संगीता चंदनशिवे यांचा परिचित असल्याचे समोर आले. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. संगीता चंदनशिवे यांच्या मालमत्तेवर हक्क मिळवण्यासाठी गोकुळ आव्हाड सातत्याने दबाव टाकत होता. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर त्याने कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, गोकुळ आव्हाड याने तुषार पारखे, विनोद पांडे आणि संतोष जाधव यांच्या मदतीने संगीता चंदनशिवे यांना विश्वासात घेऊन घोटी परिसरात नेले. तेथे त्यांचा गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






