पुणे: केंद्रीय कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. आयोगाच्या शिफारशी येण्यासाठी अद्याप काही महिने लागण्याची शक्यता असली, तरी संभाव्य फिटमेंट फॅक्टरच्या आधारे कर्मचारी नवीन वेतन आणि भत्त्यांचा अंदाज बांधू लागले आहेत.

केंद्र सरकारची प्रमुख कर्मचारी संघटना राष्ट्रीय संयुक्त सल्लागार यंत्रणेने (NC-JCM) आठव्या वेतन आयोगासाठी 3.833 फिटमेंट फॅक्टरचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा आकडा महत्त्वाकांक्षी असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, आयोगाकडून 2.0 ते 2.25 दरम्यानचा फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, फिटमेंट फॅक्टर 2.25 निश्चित झाला तरी कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात तितक्याच प्रमाणात वाढ होईल, असे नाही.

यापूर्वी सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 असतानाही एकूण पगारवाढ सुमारे 14.29 टक्के होती. तर सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 असूनही पगारात 54 टक्क्यांची वाढ झाली होती. चौथ्या आणि पाचव्या वेतन आयोगात अनुक्रमे 27.60 टक्के आणि 31 टक्के पगारवाढ देण्यात आली होती.
बँकबाजारच्या अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगाने 2.0 ते 2.57 दरम्यानचा फिटमेंट फॅक्टर निश्चित केल्यास लेव्हल 1 ते लेव्हल 18 मधील कर्मचाऱ्यांना सुमारे 31 ते 68 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळू शकते.
फिटमेंट फॅक्टर जास्त असतानाही एकूण पगारवाढ कमी का होते, यामागे महागाई भत्ता (DA) हा महत्त्वाचा घटक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TPTA) यांचा समावेश असतो. याशिवाय इतर भत्ते कर्मचाऱ्याचे पद, कामाचे स्वरूप, जोखीम आणि नियुक्तीच्या ठिकाणानुसार बदलतात.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली होती. 2026 मध्ये आयोगाचे काम सुरू झाले असून, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत वेतन आयोगाचे पोर्टल सुरू करण्यात आले. कर्मचारी संघटना आणि विविध हितधारकांसोबत चर्चाही सुरू आहेत. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष आयोगाच्या अंतिम शिफारशींकडे लागले आहे.






