पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या मैदानात उतरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने मार्ग काढावा आणि त्यांच्याशी थेट चर्चा करावी, अशी आग्रही भूमिका अण्णांनी घेतली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मौन धरणे आंदोलन अहिल्यानगर येथील प्रसिद्ध वाडिया पार्क परिसरातील गांधी स्मारकाजवळ आयोजित केले आहे. उद्या सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 या वेळेत अण्णा हजारे दोन तास शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन करतील. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हे आंदोलन पार पडणार आहे, त्या जागेला एक वेगळी ओळख देत प्रतिकात्मकरीत्या “नगरचे जंतर मंतर” असे नाव दिले जाणार आहे.

.गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून वातावरण तापले आहे. प्रशासनाने विद्यार्थ्यांवर दडपशाही न करता त्यांच्या मागण्या संवादाच्या माध्यमातून ऐकून घ्याव्यात, असा संदेश या आंदोलनातून दिला जाणार आहे. अण्णा हजारे यांच्या या भूमिकेमुळे आणि सहभागामुळे आता या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून सर्वांचे लक्ष या मौन आंदोलनाकडे लागले आहे.
भूतकाळात काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधात आणि मजबूत लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलने करून अण्णांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले होते. त्या आंदोलनांच्या लाटेमुळे देशभरातील जनता रस्त्यावर उतरली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते प्रत्यक्ष सार्वजनिक व्यासपीठांवर सक्रिय दिसले नव्हते.आता दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर त्यांनी पुन्हा सक्रिय होत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित या मौन आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







