पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील ‘औधष निरीक्षक, गट-ब’ पदासाठीच्या परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आयोगाने ही परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली असून पोलीस तपासादरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली आहे., यामध्ये एमपीएससीचे 3 अधिकारी, एका स्पर्धा परीक्षा क्लासचा चालक आणि विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

आमदार रोहित पवार आणि विविध परीक्षा संघटकांनी या संशयास्पद गैरप्रकाराविरुद्ध आवाज उठवत सातत्याने पाठपुरावा केला होता. तक्रारींची दखल घेत हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, परीक्षा होण्यापूर्वीच म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी काही उमेदवारांना गोपनीय प्रश्नपत्रिका मिळाल्याचे आणि त्याचा थेट गैरफायदा घेतला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

पेपरफुटीची ही गंभीर बाब निष्पन्न होताच परीक्षेची पारदर्शकता व गोपनीयता राखण्यासाठी आयोगाने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली आहे. एमपीएससीच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मात्र, केवळ परीक्षा रद्द करून भागणार नाही, तर या रॅकेटमागचा मूळ ‘सूत्राधार’ किंवा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेऊन त्याला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, सर्व पात्र उमेदवारांसाठी लवकरच फेरपरीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.







