मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध आयआयटी बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या घटनेशी संबंधित परीक्षा कक्षातील एक 20 मिनिटाच CCTV फुटेज समोर आले असून, पोलीस आणि गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये साहिल काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये परीक्षा कक्षातील पहिल्या रांगेत बसलेला दिसतो. परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल फोन वापरत असल्याचे लक्षात आल्यावर पर्यवेक्षक (इन्व्हिजिलेटर) त्याच्याजवळ येतात. काही वेळाच्या चर्चेनंतर साहिल आपला मोबाईल फोन शिक्षकांकडे सुपूर्द करतो आणि आपले साहित्य गोळा करून परीक्षा कक्षातून बाहेर पडताना दिसतो. या घटनेनंतर साहिलने आपल्या वसतिगृहातील खोलीवर जाऊन गळफास घेत आत्महत्या केली.

आयआयटी बॉम्बे प्रशासनाने साहिलच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, साहिल परीक्षेदरम्यान प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘ChatGPT’ चा वापर करत होता. त्याला मोबाईलसह पकडण्यात आले असले, तरी त्याच्यावर कोणतीही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

दुसरीकडे, साहिलच्या पालकांनी संस्थेवर आणि प्राध्यापकांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. साहिलचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांच्या मते, संस्थेत साहिलचा मानसिक छळ केला जात होता आणि त्याच्यासोबत भेदभाव केला जात होता. या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दूला यांच्यावर भेदभावाचा आरोप करत पालकांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हे शाखा सध्या सर्व बाजूंचा कसून तपास करत आहे.







