रांजणगाव : शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मारामारी, हल्ले आणि गोळीबाराच्या घटना समोर येत असतानाच रांजणगाव गणपती परिसरात पुन्हा मारहाणीची घटना घडली आहे. वामन वाईन्स परमिट रूमसमोर १८ सप्टेंबर रोजी रात्री एका तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी आदित्य तुषार शितोळे (वय १९, रा. रांजणगाव गणपती) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह ६ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गर्दी जमवून शितोळे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, दगडाने आणि फायटरने मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी दादा खेडकर हे पुढे आले असता त्यांच्यावरही कोयता, दगड आणि काठीने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेमुळे रांजणगाव परिसरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. दरम्यान, शिरूर शहरातही १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत हरीश गंगावणे यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तालुक्यातील वाढत्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त, संशयितांवर नजर आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत असून, गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक मोरडे यांनी दाखल केला आहे.






