डॉ. अशोक बालगुडे

पुणे, दि. २४ : गणेश विसर्जनाच्या पारंपरिक मिरवणुकांसाठी पुणे शहर सज्ज झाले असून, मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरात व्यापक वाहतूक नियोजन केले आहे. शुक्रवार (दि. २५) सकाळपासून विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत शहरातील १७ प्रमुख रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून २६ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना ४८ तास प्रवेशबंदी राहणार आहे.

विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार मार्गांवरून अलका टॉकीज चौकाकडे येणार आहे. पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची पूजा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मिरवणुकीची प्रत्यक्ष हालचाल, गर्दी आणि वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून रस्ते टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहेत.

लक्ष्मी रस्ता संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक, शिवाजी रस्ता काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक आणि टिळक रस्ता जेधे चौक ते टिळक चौक या मार्गांवर सकाळपासून निर्बंध लागू होतील. त्यानंतर बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता आणि शास्त्री रस्ता या मार्गांवरील वाहतूकही टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बागडे रस्ता आणि गुरु नानक रस्त्याचाही यात समावेश आहे.
२४ सप्टेंबरच्या रात्रीपासून नो-पार्किंग
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर आणि लगतच्या प्रमुख रस्त्यांवर गुरुवारी रात्री ११ वाजल्यापासून नो-पार्किंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, शास्त्री रस्ता, जे. एम. रस्ता, कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन कॉलेज रस्त्यांचा त्यात समावेश आहे. खंडोजी बाबा चौक ते हॉटेल वैशालीदरम्यानच्या जोडरस्त्यांच्या १०० मीटर परिसरातही पार्किंगला मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
मध्यवर्ती पुण्यातील रस्त्यांवर मिरवणुकांमुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी मिरवणूक मार्गावर प्रवेश न करता पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. कर्वे रस्ता, नळस्टॉप, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, विद्यापीठ परिसर, पुणे-सातारा रस्ता आणि अन्य जोडमार्गांचा पर्यायी वाहतूक मार्ग म्हणून वापर केला जाणार आहे. मिरवणूक ज्या भागातून पुढे जाईल, त्यानुसार संबंधित चौकांवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे.
हडपसर-मुंढवा परिसरातही बदल
काळेपडळ अंडरपास, मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर परिसरातही वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. केशवनगर, मुंढवा आणि ससाणेनगर-हडपसर भागात काही मार्गांवर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. केशवनगरहून मांजरीकडे जाणाऱ्या वाहनांना मांजरी रस्त्याऐवजी रेणुका माता मंदिर मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२६ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी सुमारे २६ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी रस्त्यांवर वाहने उभी न करता पोलिसांनी निश्चित केलेल्या वाहनतळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीचाही वापर करण्यात येत आहे. गर्दी वाढण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन त्यानुसार मनुष्यबळाची नियुक्ती आणि वाहतूक वळविण्याचे नियोजन केले जाणार आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच भाविकांची सुरक्षितता हेही प्रमुख आव्हान राहणार आहे.






