आदित्य बोराटे

पुणे : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या तरुणावर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत विमल तंबाखू, विमल पानमसाला, सुगंधी सुपारी आणि RMD असा एकूण 20 हजार 520 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल, तसेच 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

संदीप राजाराम रणदिवे (वय 27 रा. आठभाई माळा, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 25) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इंदापूर शहराच्या हद्दीतील अकलूज बायपास परिसरात मोटारसायकलवरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी रणदिवे हा एमएच 42 एजे 9338 क्रमांकाच्या लाल रंगाच्या होंडा ड्रीम युगा मोटारसायकलवरून पांढऱ्या रंगाच्या पिशवीत प्रतिबंधित गुटखा घेऊन जाताना मिळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या कारवाईत 1 हजार 452 रुपये किमतीचे विमल तंबाखूचे 66 पुडे, 13 हजार 68 रुपये किमतीचे विमल पानमसाल्याचे 66 पुडे, 2 हजार 409 रुपये किमतीची सुगंधी सुपारीचे चार बॉक्स आणि 3 हजार 600 रुपये किमतीचे RMDचे चार बॉक्स, असा एकूण 20 हजार 520 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. याशिवाय 30 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल गणेश मच्छिंद्र ढेरे यांच्या फिर्यादीवरून इंदापूर पोलिस ठाण्यात गु.र. नं. 528/2026अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 274,275 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 3(1)(zz)(iv), 30 (2)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भोईटे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश मच्छिंद्र ढेरे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.







