पुणे : जुन्नर तालुक्यातील मढ पारगाव येथे शेतातील वीजपंपाचा तीव्र विजेचा धक्का लागून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजेश देवराम चकवे (वय ४४) आणि त्यांचा १६ वर्षीय मुलगा स्मित चकवे अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेमुळे मढ पारगाव परिसरात शोककळा पसरली असून, चकवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश चकवे हे नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा स्मितही होता. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीजपंपाचा वापर सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत दोघांनाही तीव्र विजेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
राजेश चकवे हे कष्टाळू शेतकरी असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावर अवलंबून होता. स्मित हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या शिक्षणाबाबत आणि भविष्यासंदर्भात कुटुंबाने अनेक स्वप्ने पाहिली होती. मात्र, या दुर्दैवी घटनेने कुटुंबाच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच दुर्घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मढ पारगावसह संपूर्ण जुन्नर तालुक्यात या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे.







