पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराची पोलिसांसमोरच हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तलवार, कोयता आणि लोखंडी हत्यारांनी केलेल्या हल्ल्यात प्रकाश उर्फ लाल्या येवले (वय २७) याचा मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे या दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश येवले शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सुतारदरा परिसरातून जात होता. त्यावेळी तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याला अडवले. त्यानंतर आरोपींनी तलवार, कोयता आणि लोखंडी हत्यारांनी त्याच्यावर हल्ला केला. प्रकाशच्या डोक्यावर आणि पाठीवर वार करण्यात आले. तसेच लाकडी दांडक्यानेही त्याला मारहाण करण्यात आली.
दरम्यान, कोथरूड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी आणि परिसरातील अवैध धंद्यांची पाहणी करण्यासाठी गस्त घालत होते. प्रकाश येवले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याच्या घरी जाऊन तपासणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी निघाले होते.

याचवेळी रस्त्यावर काही जण एका तरुणाला मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मारहाण झालेला तरुण प्रकाश येवले असल्याचे समोर आले.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रकाशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रकाशवर यापूर्वी विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून विकी मोरे आणि अनिकेत मालपोटे या दोघांना ताब्यात घेतले आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.






