पुणे : चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत एमआरएन भीमा शुगर अँड पॉवर प्रा. लि. संचलित भीमा सहकारी साखर कारखाना, पाटस याने प्रतिमेट्रिक टन ३,५०० रुपये दराने ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ अखेर गाळप झालेल्या उसाचे पेमेंट करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सर्वप्रथम ऊस बिल अदा केल्याचा दावा कारखाना व्यवस्थापनाने केला असून, यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.

चालू गळीत हंगामात ८ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या ३१ दिवसांच्या कालावधीत भीमा पाटस कारखान्याने एकूण २ लाख ७३ हजार १०१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कालावधीत २ लाख ६३ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.७१ टक्के असून, दैनिक साखर उतारा १०.४७ टक्के नोंदविण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात गाळपाच्या बाबतीतही कारखान्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून, पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली. गाळपाचे प्रमाण, साखर उताऱ्यातील सुधारणा आणि ऊस उत्पादकांना वेळेत पेमेंट या आघाड्यांवर कारखाना कामगिरी करत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

प्रतिटन ३,५०० रुपये दराने ऊस बिल वेळेत जमा झाल्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार आणि ऊसतोड कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले. वेळेत पेमेंट केल्यामुळे कारखाना व्यवस्थापन आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

निराणी उद्योग समूहाचे अध्यक्ष मुरुगेशजी निराणी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर संगमेशजी निराणी, कार्यकारी संचालक विजय निराणी आणि डायरेक्टर ऑपरेशन्स विशाल निराणी यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याची कामगिरी चांगली होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांचे मार्गदर्शन, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे परिश्रम आणि सांघिक योगदान यांचाही या कामगिरीत वाटा असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले आहे.






