पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (PMPML) बनावट एकदिवसीय बस पास तयार केल्याचा प्रकार हडपसर परिसरात समोर आला आहे. ChatGPT च्या मदतीने अधिकृत पाससारखा दिसणारा बनावट डिजिटल पास तयार करून तिकीट न काढता प्रवास केल्याचा आरोप २६ वर्षीय तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशांत राजपाल कोल्हे (वय २६) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने एम.टेक.चे शिक्षण पूर्ण केले असून, सध्या तो नोकरीच्या शोधात असल्याची माहिती आहे.
ही घटना २३ ऑक्टोबर रोजी हडपसर येथील पीएमपीएमएल बसस्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, निशांत कोल्हे बसमध्ये चढल्यानंतर त्याने अधिकृत ॲपवरून एकदिवसीय बस पास काढल्याचे वाहकाला सांगितले. मात्र, त्याने दाखवलेल्या डिजिटल पासबाबत वाहकाला संशय आला. त्यामुळे पुढील पडताळणीसाठी त्याला बस गाडीतळावर आणण्यात आले.

तक्रारीनुसार, निशांतने ChatGPT च्या मदतीने पीएमपीएमएलच्या अधिकृत एकदिवसीय पाससारखा दिसणारा बनावट डिजिटल पास तयार केला होता. हा पास खरा असल्याचे भासवून त्याने तिकीट न काढता प्रवास केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पीएमपीएमएलचे ७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पीएमपीएमएलचे तिकीट तपासनीस संजय भगुजी आढाळगे (वय ५६) यांनी या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट डिजिटल दस्तऐवज तयार करण्याच्या संभाव्य धोक्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, कथित बनावट पास नेमका कसा तयार करण्यात आला आणि त्यासाठी ChatGPT चा कोणत्या प्रकारे वापर झाला, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.






