मुंबई : मुंबईतील भुलेश्वर येथे ‘भुलेश्वरचा राजा’ या 22 फुटी गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत 2 भाविकांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाले. या घटनेनंतर मूर्तीकार अनिकेत देसाई यांच्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, एलटी मार्ग पोलिसांनी आता मूर्तीकार अनिकेत देसाई यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,मूर्ती कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावर तिच्या पाठीमागचे वेल्डिंग तुटले होते. तसेच मूर्तीचा मागचा ब्लॉक आणि स्क्रू देखील निघाला होता.वेल्डिंग तुटल्यामुळे मूर्ती पुन्हा कारखान्यात आणून तिची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्ती पुढे नेली, असे देसाई यांनी आपल्या जबाबात स्पष्ट केले.
दुरुस्तीनंतरही वेल्डिंगचा भाग पुन्हा तुटल्याने मूर्तीचा तोल गेला आणि ती कोसळली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने मोठ्या गणेश मूर्तींच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे.
1 टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेश मूर्तींसाठी आता फिटनेस (योग्यतेचे) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.तसेच मूर्तीची ऑर्डर दिल्यापासून ते ती मंडळात सुरक्षित पोहोचेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची नोंद पालिकेकडे ठेवली जाईल.

या संदर्भात नवीन कार्यप्रणाली तयार करण्यासाठी DMC झोन-2 चे अधिकारी प्रशांत सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात वाहतूक व सुरक्षेच्या नियमांवर अंतिम निर्णय घेतला जाईल.या घटनेमुळे आगामी गणेशोत्सवातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालिका आणि पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे







