पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून या गंभीर समस्येविरोधात समाजातल्या प्रत्येक घटकाने सजग राहून ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (एनसीबी) संचालक अमित घावटे यांनी केले. शिरूर येथील सनशाईन सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित ‘अमली पदार्थांचा वाढता विळखा’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोरराजे निंबाळकर होते.या वेळी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ. अयाज तांबोळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके आदि उपस्थित होते.

यावेळी घावटे पुढे म्हणाले कि , “अमली पदार्थांची समस्या आता केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहिलेली नसून,ग्रामीण भागातही तिचे लोण पसरले आहे. वाढता अंमली पदार्थांचा वापर देशाच्या सुरक्षेपुढे मोठे आव्हान उभे करत आहे. कोरोनाच्या काळानंतर नशेचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने अंमली पदार्थांविरोधातील लढा व्यापक केला असून, या समस्येचा २०२९ पर्यंत पूर्णपणे नायनाट करण्याचा संकल्प केला आहे.”

पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे
तरुणांमधील आणि मुलांमधील वाढत्या व्यसनाधीनतेबद्दल चिंता व्यक्त करत घावटे यांनी पालकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. “पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तनावर आणि दिनचर्येवर काळजीपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे. मुले सोशल मीडियाचा वापर कसा करतात, कोणाच्या संपर्कात आहेत, ती एकांतात राहतात का, याकडे बारकाईने पाहावे. तसेच घरातील पैसे सुरक्षित आहेत का आणि पाल्याचा अचानक खर्च वाढला आहे का, तो तणावाखाली आहे का, या गोष्टी तपासाव्यात. पाल्यांच्या मित्रांच्या संगतीवरही लक्ष देऊन कोणतीही शंका आल्यास वेळीच योग्य उपाययोजना करावी,” असा सल्ला त्यांनी दिला.
अमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, या संकटाविरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहनही घावटे यांनी यावेळी केले.
या वेळी पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी डॉ.अयाज तांबोळी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेवराईचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांचा राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाल्याबद्दल विशेष नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक किशोरराजे निंबाळकर यांनी केले, तर उपस्थितांचा परिचय व स्वागत डॉ. विक्रम घावटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले आणि आभार उदय शिंदे यांनी मानले.






