डॉ. अशोक बालगुडे

पुणे: गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात तब्बल १८ वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरारी आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-६ने मांजरी परिसरातून जेरबंद केले. राम नवनाथ चव्हाण (वय ४४, रा. महादेव नगर, मांजरी) असे आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात २००८ मध्ये त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल होता.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फरारी आरोपींचा शोध सुरू असताना पोलिस अंमलदार संतोष राठोड आणि गणेश माने यांना विश्वसनीय सूत्रांकडून चव्हाण याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, महादेव नगर येथील ए. एम. कॉलेजसमोर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कार्यवाहीसाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिस निरीक्षक संतोष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव, सहाय्यक फौजदार अरुणा म्हेत्रे, पोलिस हवालदार प्रशांत कर्णवर, महिला पोलिस हवालदार पल्लवी मोरे व मनीषा लोखंडे, तसेच पोलिस अंमलदार संतोष राठोड, गणेश माने आणि अक्षय बांदल यांच्या पथकाने ही कारवाई केली.







