पुणे : मुंढवा परिसरातील मुळा-मुठा नदीपात्रात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी ही घटना उघडकीस आली. तरुणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मृत तरुणीच्या आईने घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नंदिनी दुर्गप्पा गायकवाड (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे मृत तरुणीचे नाव आहे. नंदिनी बेपत्ता असल्याची तक्रार यापूर्वी मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
शनिवारी खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंढवा नदीकाठाजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच इतरांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृत तरुणीची ओळख पटवण्यात आली.

सुरुवातीला खराडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, नंदिनीच्या मृत्यूबाबत तिची आई जयलक्ष्मी गायकवाड यांनी संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दिली.

आईने घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणात अतिरिक्त कलमे समाविष्ट करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदिनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तिच्या मृत्यूमागे कोणते कारण आहे आणि यामध्ये कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मृत्यूचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार असून, सध्या घातपाताच्या संशयाला दुजोरा देणारी अंतिम माहिती समोर आलेली नाही.






