पुणे : पुण्यातील मांजरी (हडपसर) येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे बेमुदत आमरण उपोषण गेल्या 13 दिवसांपासून सुरू आहे. प्रदीर्घ उपोषणामुळे आंदोलक विद्यार्थ्यांची शारीरिक प्रकृती प्रचंड खालावली असून परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. राहुल धनवे या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.

या आंदोलनामागे विद्यार्थ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत. विशेषतः 5 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेला वादग्रस्त शासन निर्णय (GR) तात्काळ रद्द करावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याशिवाय शासकीय वसतिगृहांमधील सुविधांचा ढासळलेला दर्जा आणि स्थानिक समस्या दूर करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि न्याय मिळावा, या विषयाकडेही शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान डिहायड्रेशन आणि श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामुळे काही विद्यार्थ्यांना तातडीने ससून तसेच इतर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मांजरी बुद्रुक येथील वसतिगृहाच्या आवारात हे आंदोलन सुरू असून, 13 दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस तोडगा न निघाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

आता वेळेत योग्य पावले न उचलल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.







