सोलापूर: सोलापुरात पत्नी परत मिळावी आणि प्रशासनाने आपल्या तक्रारीची दखल घ्यावी, यासाठी एका पतीने केलेला अनोखा निषेध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या 15 दिवसांपासून न्यायाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या दीपक सूर्यवंशी यांनी अखेर जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटसमोर चक्क गाढविणीसोबत प्रतिकात्मक विवाह केला. या अनोख्या आंदोलनाची शहरासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

दीपक सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा गेल्या 16 वर्षांपासून संसार सुरू होता. मात्र, त्यांची पत्नी कोणतीही पूर्वकल्पना न देता घरातून निघून गेली. पत्नीला परत आणण्यासाठी त्यांनी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडे अनेकदा दाद मागितली. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे. पत्नीच्या जाण्यानंतर आपण मानसिक तणावात असून, तिचा शोध घेऊन तिला पुन्हा घरी आणून द्यावे, अशी मागणी ते करत आहेत.

दीपक सूर्यवंशी यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांची पत्नी स्वतःहून घरातून गेलेली नसून, त्यांचे मेहुणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी तिला फूस लावून पळवून नेले असून आपल्यापासून दूर ठेवले आहे. त्यांच्या या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

गेल्या 15 दिवसांपासून उन्हात उपोषण करूनही प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने आपली दखल घेतली नसल्याने आपण हा अनोखा मार्ग स्वीकारल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. सकाळी त्यांनी जिल्हा परिषद गेटसमोर गाढविणीला आणले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टका म्हणत तिच्या गळ्यात पुष्पहार घालून प्रतिकात्मक विवाह केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता तरी प्रशासन आणि पोलीस त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन पत्नीचा शोध घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.







