मुंबई: कर्तव्य बजावताना जीवाची पर्वा न करता धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आता राज्य सरकारकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. अशा पोलिसांना ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राज्यस्तरावर स्वतंत्र ओळख मिळणार आहे.

मुख्यमंत्री शौर्य पदक मिळणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ५० हजार रुपयांची रोख रक्कम, विशेष पदक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी या पुरस्काराची मरणोत्तर तरतूदही करण्यात आली आहे. दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाणार आहे. या पुरस्कारांसाठी निश्चित संख्या ठेवण्यात आलेली नसून, प्रत्यक्ष कामगिरी आणि प्राप्त प्रस्तावांच्या आधारे पात्र पोलिसांची निवड केली जाणार आहे.

गडचिरोली, गोंदिया यांसारख्या नक्षलग्रस्त भागांसह माओवाद, दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, तस्करी तसेच गंभीर कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीत पोलिसांना अनेकदा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. अशा परिस्थितीत दाखवलेल्या धाडसाची दखल घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.

या पदकासाठी बहुस्तरीय निवड प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस यंत्रणा आणि पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरून पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पाठवले जातील. त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून या प्रस्तावांची छाननी केली जाईल. पुढे गृह विभागाच्या वरिष्ठ पातळीवर प्रस्तावांचा विचार करून ते अंतिम मंजुरीसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर केले जाणार आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पोलिसांच्या धाडसी आणि जोखमीच्या सेवेला प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. कठीण परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.







