मुंबई: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला सहा दिवस उलटले असताना या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला मोठे यश मिळाले आहे. पूर्णेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल रायगड जिल्ह्यातील कर्नाळा जंगलातून पोलिसांनी जप्त केले आहे. आरोपींनी हत्या केल्यानंतर हे हत्यार जंगलात लपवून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी पिस्तुलासोबत एका आरोपीचा मोबाईलही जप्त केला आहे.

एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव आणि विशेष तपास अधिकारी शैलेश साळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर सात राऊंड गोळीबार केल्यानंतर धारदार शस्त्रानेही वार केल्याचे तपासात समोर आले आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र-गोवा सीमेच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच हत्येचा कट रचल्याचा संशय असलेल्या सुभाष उर्फ पप्या शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे. निखिल यादव आणि नितेश पवार यांच्यावर हत्येनंतर वापरण्यात आलेली हत्यारे लपवण्याची जबाबदारी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या केल्यानंतर संतोष कनोजिया उर्फ टल्ली, नितेश पवार, निखिल यादव आणि आणखी एक हल्लेखोर अल्टो कारमधून फरार झाले. कल्याण फाटा येथे निखिल आणि नितेश कारमधून उतरले. त्यानंतर ते मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने निघाले. पुढे कर्नाळा परिसरात त्यांनी हत्यारे लपवली. मात्र, जवळील पैसे संपल्याने ते कर्नाळा येथील एका दुकानात थांबले. ठाणे गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांचा ठावठिकाणा शोधून त्यांना अटक केली.
पोलिसांच्या तपासानुसार, पूर्णेकर यांच्या हत्येचा कट सुमारे महिनाभर आधी रचण्यात आला होता. त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यासोबतच हल्ल्यापूर्वी मॉक ड्रिलही करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी काही आरोपी फरार असून ठाणे गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक त्यांच्या मागावर आहे. फरार आरोपी संतोष कनोजिया याचा कारमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्याची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच हेल्मेटधारी हल्लेखोराचाही शोध सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील उर्वरित आरोपींना पोलीस कधी अटक करतात, याकडे लक्ष लागले आहे.






