पुणे: पुण्यात सतत आजारी असल्याचे कारण सांगून एका तृतीयपंथी महिलेला भूतबाधा झाल्याची भीती दाखवत उपचाराच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आणि अघोरी प्रकार करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भूतबाधा काढण्याच्या नावाखाली संबंधित महिलेकडून सुमारे 70 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच तिला कपडे काढण्यास भाग पाडून मिरचीची धुरी देण्यात आली आणि खिडकीला बांधून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तृतीयपंथी समाजातील गुरु महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आशा पुजारी (वय 35), अश्विन इंगळे (वय 28), ज्योती पुजारी (वय 30) आणि सोनाली (वय 30, सर्व रा. बैलबाजार, कुर्ला, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार गणेश पेठेतील मठ तसेच कुर्ला येथील मठात 26 एप्रिल ते 18 सप्टेंबर 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत 26 वर्षीय तृतीयपंथी महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गेल्या तीन वर्षांपासून गणेश पेठेतील मठात राहत असून जोगवा मागून उदरनिर्वाह करते. मागील वर्षभरापासून तिची प्रकृती ठीक नसल्याने ती उपचार घेत होती. एप्रिलमध्ये तिला इंस्टाग्रामवर आशा पुजारी या तृतीयपंथी गुरु असून त्या देवीच्या आशीर्वादाने लोकांच्या समस्या सोडवतात, अशी माहिती दिसली. त्यानंतर महिलेने आपल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबाबत त्यांना संदेश केला.

आशा पुजारी आणि अश्विन इंगळे यांनी महिलेला भूतबाधा झाल्याचे सांगून तिच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवली. उपचारासाठी 50 हजार रुपये लागतील, असे सांगून अश्विनच्या फोन-पे खात्यावर पैसे घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर कुर्ला येथील मठात नेऊन बाहुल्या, मिरची, तुरटी, उडीद, टाचण्या आणि लिंबांचा वापर करून चार ते पाच तास तथाकथित उतारा करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने महिलेला पुन्हा मठात बोलावण्यात आले. 10 मे रोजी झालेल्या प्रकारात महिलेला कपडे काढण्यास भाग पाडून मिरचीची धुरी देण्यात आली. तसेच तिला खिडकीला बांधून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. आशा पुजारी यांनी तिच्या छातीवर आणि गुप्त भागावर मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यावेळी आणखी 20 हजार रुपये घेण्यात आले, तसेच तिच्या कानातील सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा आरोप आहे.
यानंतरही आरोपींकडून फोन करून पैशांची मागणी आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. सप्टेंबरमध्ये आरोपी डुल्या मारुती चौकात येऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियमासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश महाला पुढील तपास करीत आहेत.







