पुणे : उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील ३४ वर्षीय तरुणीचा पुण्यातील एका बंद फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संबंधित तरुणी लंडनमध्ये असल्याचे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते. मात्र, तिने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटन सोडल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. अखेर ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या व्यवहारांचा माग काढत पोलिसांनी पुण्यातील फ्लॅट शोधून काढला. तेथे तिचा मृतदेह आढळून आला. या तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.

मृत तरुणीचे नाव अपूर्वा (नाव बदलले आहे, वय ३४) असे आहे. तिचे वडील छत्रपती संभाजीनगरमधील निवृत्त वर्ग-१ शासकीय अधिकारी आहेत. पतीच्या निधनानंतर अपूर्वा जुलै २०२५ मध्ये एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेली होती. तेथे ती स्वतंत्र खोली घेऊन राहत होती. शिक्षणासोबत अर्धवेळ नोकरीही करत होती.
अपूर्वा नियमितपणे आई-वडिलांच्या संपर्कात होती. २३ ऑक्टोबर रोजी आईशी बोलताना तिने नोकरीच्या मुलाखतीसाठी घाईत असल्याचे सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिचा मोबाइल बंद लागला. वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.

मुलीचा शोध घेण्यासाठी पालकांनी लंडनमधील तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधला. त्यानंतर स्थानिक पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली. पासपोर्ट आणि इमिग्रेशन नोंदींच्या तपासणीत अपूर्वाने ऑगस्ट २०२६ च्या अखेरीसच ब्रिटन सोडल्याची माहिती समोर आली.

ही बाब समजल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अपूर्वा भारतात कधी परतली आणि तिने याबाबत कुटुंबीयांना माहिती का दिली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले.
अपूर्वाच्या वडिलांनी तिच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले असता ८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान विविध ऑनलाइन सेवांवर व्यवहार झाल्याचे आढळले. यामध्ये झोमॅटो, ब्लिंकिट, स्विगी, बुक माय शो, मेक माय ट्रिप आणि व्हीएफएस ग्लोबल सर्व्हिसेस यांचा समावेश होता.
या व्यवहारांच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर आणि पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बोराडे यांच्या पथकाने पुण्यात शोधमोहीम राबवली.
तपासादरम्यान २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पिझ्झाच्या ऑर्डरचा पत्ता पोलिसांच्या हाती लागला. या पत्त्याच्या आधारे पोलिसांनी पुण्यातील एका सोसायटीतील फ्लॅट गाठला. मात्र, फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. परिसरात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
सोसायटीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बेडरूममध्ये अपूर्वाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार तिचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अपूर्वा लंडनमधून भारतात कधी आली, पुण्यात कोणाच्या संपर्कात होती आणि कुटुंबीयांना न सांगता येथे का राहत होती, याचा शोध पोलिस घेत आहेत. तिचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला, आत्महत्येमुळे झाला की यामागे घातपात आहे, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील पोलीस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.







