लोणी काळभोर : सोलापूरहून पुण्याकडे 35 टन सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकचालक आणि त्याच्या हेल्परला कुंजीरवाडी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ चोरट्यांनी लक्ष्य केले. ट्रक बाजूला उभा करून दोघे झोपले असताना त्यांच्या खिशातील दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 47 हजार 499 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 23 ऑक्टोबर रोजी पहाटे घडली.

याप्रकरणी अविनाश सुभाष पवार (वय 29, रा. एकुर्का, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पवार हे कुंजीरवाडी येथील सिद्धिविनायक ट्रान्सपोर्टमध्ये ट्रकचालक म्हणून काम करतात, तर त्यांचा भाऊ किरण पवार हा हेल्पर म्हणून काम करतो.
अविनाश पवार यांनी सोलापूर येथील चेट्टीनाड कंपनीतून 16 टायरच्या टाटा ट्रकमध्ये 35 टन सिमेंट 23 ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भरले आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ते कुंजीरवाडी येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले. झोप येत असल्याने त्यांनी ट्रक पेट्रोल पंपाच्या एका बाजूला उभा केला आणि दरवाजा बंद करून ते दोघे झोपी गेले.

दरम्यान, सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोघे जागे झाल्यानंतर त्यांना आपले मोबाईल आणि पैशांचे पाकीट आढळून आले नाही. ट्रकमध्ये तसेच स्वतःच्या खिशात शोध घेतल्यानंतरही ऐवज मिळाला नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने झोपेचा फायदा घेत चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

चोरीस गेलेल्या ऐवजात 26 हजार 999 रुपये किमतीचा ओप्पो एफ 31 प्रो 5G मोबाईल, 18 हजार रुपये किमतीचा ओप्पो ए5 प्रो 5G मोबाईल आणि अडीच हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. एकूण 47 हजार 499 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.






