मुंबई: भारतात लवकरच कागदी नोटांच्या ऐवजी प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची प्रायोगिक चाचणी म्हणजेच फील्ड ट्रायल करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या विशेष साहित्याच्या पुरवठ्यासाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या हालचालीमुळे भारतात पॉलिमर नोटांचा प्रयोग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या प्रकल्पासाठी भारतातील UFlex या कंपनीने अमेरिकेतील Spectra Systems सोबत भागीदारी करत बोली सादर केल्याची माहिती आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या फील्ड ट्रायलला सरकारची मंजुरी मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात निवडक ठिकाणी या नोटांची प्रत्यक्ष चाचणी केली जाऊ शकते.

पॉलिमर नोटांचा वापर जगातील काही देशांमध्ये यापूर्वीपासून केला जात आहे. कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात, असा दावा केला जातो. पाणी, धूळ आणि दैनंदिन वापरामुळे होणारे नुकसान यांचा सामना करण्याची त्यांची क्षमता अधिक असल्याने नोटांचे आयुष्य वाढू शकते. त्यामुळे चलनाच्या देखभालीवरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीनेही या नोटांचा विचार केला जात आहे.

रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वी भारतात प्लास्टिक नोटांचा प्रायोगिक प्रकल्प राबवण्याची तयारी केली होती. आता पुन्हा एकदा या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सध्या हा प्रयोगात्मक टप्पा असून, या नोटा संपूर्ण देशात नियमित चलनात कधी येतील याबाबत कोणतीही अंतिम माहिती नाही.
या प्रकल्पाची सुरुवात भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड अर्थात BRBNMPL कडून करण्यात आली आहे. ही कंपनी भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी आहे. पॉलिमर किंवा प्लास्टिक नोटांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विशेष साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांची निवड या प्रक्रियेत केली जात आहे.






