आदित्य बोराटे –

पुणे : इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील उत्तम जालिंधर जाधव यांच्या खूनप्रकरणात गेल्या सुमारे 18 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी कळंब (ता. इंदापूर) येथे सापळा रचून ताब्यात घेतले. सोमणाथ बबन पवार (वय ३३, रा. कळंब, ता. इंदापूर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमसाखर येथे उत्तम जालिंधर जाधव यांच्या खूनप्रकरणाचा तपास सुरू असताना या प्रकरणातील काही आरोपी फरार असल्याचे निष्पन्न झाले होते. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बारामती विभागातील पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती.

या तपासादरम्यान फरार आरोपी सोमणाथ पवार हा कळंब परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने आपले नाव सोमणाथ बबन पवार असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्याला वालचंदनगर पोलिस ठाण्यात आणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपीवर या खूनप्रकरणात गुन्हा दाखल असून, तो दीर्घकाळापासून पोलिसांच्या शोधात होता. त्याचा या प्रकरणातील नेमका सहभाग आणि इतर बाबींबाबत पुढील तपास सुरू आहे.
अटक केल्यानंतर आरोपीला विशेष मोक्का न्यायालय, शिवाजीनगर, पुणे येथे रिमांडसाठी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस हवालदार आप्पा दराडे, किर्तीलाल गायकवाड, पोलिस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, अभिजित कळसकर,राहुल माने यांच्या पथकाने केली.







