न्हावरे : साखर आणि गुळाच्या बाजारभावात तेजी असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.मांडवगण फराटा आणि रांजणगाव सांडस येथे झालेल्या शेतकरी बैठका व एल्गार मेळाव्यातून ऊसदरासाठी शेतकऱ्यांनी एकजुटी केली आहे.सन २०२६-२७ च्या आगामी ऊस गाळप हंगामासाठी साडेचार ते पाच हजार रुपये प्रतिटन दर जाहीर केल्याशिवाय ऊस कारखाना किंवा गुऱ्हाळ घरांना ऊस देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून ऊसदरासाठी शिरूर तालुक्यातून उठाव सुरू झाल्याने आगामी हंगामात या आंदोलनाचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच होणार आहे.

मांडवगण फराटा येथील श्री ग्रामदैवत वाघेश्वर मंदिरात मंगळवारी(ता.२५)ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी हात वर करून एकमताने पाच हजार रुपये प्रतिटन बाजारभावाची मागणी केली.योग्य दर मिळाला नाही,तर ऊसाला कोयता लावून देणार नाही. तसेच ऊसतोडणीला विरोध केला जाईल,असा इशाराही यावेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रसंगी शेतकऱ्यांनी सामुहिकरीत्या सांगितले की, तेलापासून साखरेपर्यंत विविध वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.परंतू,शेतीमालाच्या दरात त्या तुलनेत वाढ झालेली नाही. त्यातच खतांचे वाढलेले दर,औषध फवारणीचा खर्च,मजुरी,मशागत तसेच सिंचनाचा वाढता खर्च यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.यंदा काही भागांत पावसाचे प्रमाण कमी असून ऊस पिकावर रोगराईचाही प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाच्या तुलनेत ऊसाला योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

दरम्यान,रांजणगाव सांडस येथे सोमवारी(ता.२४)झालेल्या शेतकरी एल्गार मेळाव्यास सुमारे ५०० ते ६०० शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी साडेचार हजार ते ५ हजार रुपये प्रतिटन दर मिळाल्याशिवाय ऊस देणार नाही असा निर्धार केला.तसेच ५ सप्टेंबरपर्यंत गुऱ्हाळाला ऊस न देण्याचा ठराव हात वर करून उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी एकमताने मंजूर केला.
सध्या साखरेला सुमारे ७० रुपये किलो,तर गुळाला ५५ ते ६० रुपये किलो बाजारभाव मिळत असताना गुऱ्हाळासाठी उसाला सुमारे ३ हजार ८०० रुपये दर का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.एक टन उसापासून सुमारे १२० किलो गूळ तयार होत असून,६० रुपये किलो दराने तयार होणाऱ्या गुळाची किंमत सुमारे ७ हजार २०० रुपये होते.उत्पादन व इतर खर्च वजा करूनही शेतकऱ्यांना साडेचार हजार रुपये प्रतिटन दर देण्यास अडचण काय, असा सवाल मेळाव्यात करण्यात आला.
कात्रजचे संचालक निखिल तांबे यांनी शेतकऱ्याला आपल्या घामाचे पैसे मागण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगत ऊस उत्पादकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन केले.आप्पासाहेब रणदिवे यांनी गुऱ्हाळचालक हे शेतकऱ्यांचे विरोधक नसून तेही शेतकरीच आहेत.मात्र,उसाचा बाजारभाव स्पष्ट व न्याय्य करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.
गुऱ्हाळचालक रोहिदास इटनर यांनी चार हजार रुपये प्रतिटन दर देणे शक्य असल्याचे सांगितले. मात्र,ऊसदराच्या मुद्द्यावरून मेळाव्यात काही काळ वातावरण तापले. शिरूर व दौंड तालुक्यातील गुऱ्हाळचालकांनी शेतकऱ्यांसोबत तातडीने बैठक घेऊन ऊसाचा न्याय्य दर निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.
शिरूर तालुक्यातून सुरू झालेला हा ऊसदराचा उठाव केवळ दोन गावांपुरता मर्यादित न राहता पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या बाजारभावाच्या प्रश्नाला व्यापक स्वरूप देणार आहे.त्यामुळे २०२६-२७ च्या हंगामासाठी सुरुवातीपासूनच दराबाबत शेतकऱ्यांनी एकजूट दाखविल्यास कारखानदार व गुऱ्हाळचालकांवर योग्य दर देण्यासाठी दबाव निर्माण होणार आहे.तसेच आगामी हंगामात ऊस उत्पादकांच्या हातात अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याप्रसंगी एल्गार मेळाव्याला शिरूरच्या पूर्व भागातून दत्तात्रय फराटे,नवनाथ शितोळे, लक्ष्मणराव फराटे,महादेव फराटे,रावसाहेब जगताप,कैलास फराटे, बाळासाहेब फराटे,बाळासाहेब शितोळे,शरद गायकवाड,संजय जगताप,नवनाथ दरेकर,दादासो उदमले,संजय फराटे,निखिल मचाले यांच्यासह रांजणगाव सांडस परिसरातील संपत फराटे, पंकज रणदिवे,अजित रणदिवे, राहुल रणदिवे,संभाजी रणदिवे, सचिन रणदिवे,प्रवीण रणदिवे, बापूसाहेब राक्षे,तुषार जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व गुऱ्हाळमालक उपस्थित होते.







