उरुळी कांचन, ता. ५ : उरुळी कांचन (ता.हवेली) परिसरातील जय मल्हार रस्त्यावरील वडार आळी येथे मागील तीन-चार दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. अचानक होणाऱ्या दगडफेकीमुळे घरांच्या पत्र्यांना मोठमोठी छिद्रे पडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दगडफेकीचा आवाज झाल्यानंतर नागरिक घराबाहेर पडत असून, काही महिला व लहान मुलांना सुरक्षिततेच्या कारणास्तव घराबाहेर थांबावे लागत आहे. तर परिसरातील तरुण घरांच्या तसेच इमारतींच्या छतावर जाऊन दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्ती पसार होत असल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नाही.

या प्रकाराची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या उपस्थितीतही सुमारे सात ते आठ घरांवर दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणाकडून आणि कोणत्या कारणासाठी केला जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दगडफेकीमुळे अनेक घरांच्या पत्र्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सुदैवाने या दगडफेकीत अद्याप कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, एखादा मोठा दगड घरातील व्यक्तीला लागल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, अज्ञात व्यक्तींकडून करण्यात येणाऱ्या या दगडफेकीचा उरुळी कांचन पोलिसांकडून तपास सुरू असून, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील परिस्थितीची पाहणी केली जात आहे. या प्रकाराला आळा घालून नागरिकांना सुरक्षितता मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.






