मुंबई: राज्यसभेच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांदरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यसभेच्या जागेसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारात गेल्याचा दावा फेटाळून लावत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

नवनीत राणा म्हणाल्या, “आमच्या विरोधात सर्व नेते आहेत. पण रवी राणा चौथ्यांदा आमदार झाले आहेत. राज्यसभेसाठी मी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. अनेक लोक म्हणाले की, नवनीत राणा राज्यसभेसाठी NCP च्या दारात गेली. पण नवनीत राणा कोणाच्या दारात गेली नाही. मी 2024 मध्ये तिकिटासाठीही कोणाच्या दारात गेले नाही. नवनीत राणा इतकी कमजोर नाही की, मी राज्यसभेसाठी दारावर जाईन.”

त्या पुढे म्हणाल्या, “मी माझी विचारधारा सोडून कोठेही जाणार नाही. पद येतील, पद जातील, पण माझे विचार शेवटच्या श्वासापर्यंत लढतील. मी लोकसभेसाठी पूर्ण कंबर कसली आहे. मी मैदानात उभी आहे.”
संसदेतील आपल्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “मी खासदार असताना अनेक विद्यार्थ्यांना संसदेत घेऊन जात होते. पण आता ते करता येत नाही, याचं दुःख आहे. अमरावती-नागपूर मेट्रो लवकर सुरू होईल. येणारं भविष्य आपलं आहे, कोणाला भविष्यासोबत खेळू देणार नाही.”
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, महायुतीतील जागावाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर नवनीत राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.






