पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. ७५ वर्षीय वृद्ध रुग्णाच्या हृदयाच्या झडपेचे कार्य डॉक्टरांनी अत्यंत प्रगत अशा ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (TAVR) तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ववत केले. विशेष म्हणजे, हे चीर, भूल किंवा छाती न उघडता केले आहे. दीड तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि डॉक्टरांशी संवादही साधत होता, हे या उपचारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले आहे.

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी सांगितले की, संबंधित रुग्णाचा आजार अत्यंत गुंतागुंतीचा होता. १५ वर्षांपूर्वी त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती, तर २ वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सध्या त्यांना हृदयाची मुख्य झडप अरुंद होण्याचा (एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस) त्रास होत होता. रुग्णाचे वाढते वय आणि यापूर्वी झालेल्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया लक्षात घेता, पुन्हा ओपन हार्ट सर्जरी करणे धोक्याचे होते. त्यामुळे डॉक्टरांच्या टीमने TAVR हा शस्त्रक्रियाविरहित मार्ग निवडला.

या उपचार पद्धतीत मांडीतील रक्तवाहिनीत सुईद्वारे एक छोटे छिद्र करून, कॅथेटरच्या मदतीने हृदयापर्यंत नवीन झडप व्हॉल्व्ह पोहोचवली जाते. पारंपारिक पद्धतीपेक्षा ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आहे. डॉ. सुजीथ कुमार यांनी सांगितले की, उपचारांनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्णाला चालण्यास सांगण्यात आले आणि केवळ ४ दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एका महिन्यानंतरच्या तपासणीत रुग्ण आता पूर्णपणे तंदुरुस्त असून, त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही.
रुग्णाने सांगितले की, आम्ही घाबरुन शोध सुरू केला आणि त्यानंतर विश्वराज हॉस्पिटल मधील डॉ. इंगोले यांना भेटलो. ज्यांनी आम्हाला आश्वासन दिले की टीएव्हीआर माझ्यासाठी सुरक्षित असेल. ते पुढे म्हणाले, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर सौहार्दपूर्ण होते.
विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय सातत्याने उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवत आहे. ही प्रक्रिया ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी केली असून भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड आणि डॉ. दीपक कवडे, सहाय्यक डॉ. विष्णू आणि डॉ. अनघा, तंत्रज्ञ मनोज आणि कल्याण तसेच स्टाफ नर्स अमित आणि मीना यांनी यशस्वीरीत्या केली.
३०० पेक्षा अधिक खाटांची सोय असलेल्या विश्वराज हॉस्पिटलने आपल्या या प्रगत उपचार पद्धतीद्वारे आधुनिक वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या आहेत. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही कामगिरी नक्कीच एक मोठा आशेचा किरण ठरली आहे.







