पुणे: पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. उच्चशिक्षित केतनची हत्या त्याच्याच होणाऱ्या पत्नीने, सिया गोयल हिने, तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली असून, आपल्या मुलीचे हे भयंकर कृत्य समजताच सियाच्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. उच्च रक्तदाबाचा त्रास बळावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे या दोघांचे लग्न करण्याचे नियोजन होते आणि १९ फेब्रुवारी रोजी त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र, सियाचे मन मात्र काही वेगळेच कारस्थान रचत होते. १८ जून रोजी तिने केतनला ट्रेकिंगसाठी लोहगड किल्ल्यावर नेले. तिथे प्रेमाच्या गप्पांमध्ये त्याला पूर्णपणे गुंतवून सियाने बेसावध केले. केतन पूर्णपणे तिच्या बोलण्यात मग्न असतानाच, तिथे दबा धरून बसलेला तिचा प्रियकर चेतन चौधरी अचानक मागे आला आणि त्याने केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.

या घटनेमुळे गोयल कुटुंबाची समाजात मोठी नाचक्की झाली आहे. एका उच्चशिक्षित मुलीने लग्नाच्या काही महिने आधीच अशा प्रकारे प्रेमाचा विश्वासघात करून आपल्या जोडीदाराचा काटा काढल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या सिया आणि चेतन दोन्ही पोलीस कोठडीत असून, पोलीस या गंभीर प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेने एक आनंदी कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.






