पुणे : नवीन वीज मीटर जोडणी करून देण्यासाठी शासकीय ठेकेदाराकडून तब्बल 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्या महावितरणच्या सिनिअर टेक्निशियन (वायरमन) कर्मचाऱ्याला न्यायालयाने दिलासा दिला आहे. वडगाव मावळ येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. भागवत तोरणे यांनी दिली.

गजानन बाळासाहेब चट्टे (वय -35, महावितरण येलवाडी कार्यालय, मूळ गाव हट्टा, ता. वसमत, जि. हिंगोली) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. चट्टे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात कडक अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील येलवाडी येथे एका महिलेच्या जागेवरील 11 प्लॉटच्या नवीन वीज मीटर जोडणीचे आणि जागेच्या सर्व्हेक्षणाचे काम एका शासकीय मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल ठेकेदाराकडे (कॉन्ट्रॅक्टर) होते. हे काम मंजूर करून आणल्यानंतर, जागेचा सर्व्हे देण्यासाठी आणि 11 वीज मीटर बसवून देण्यासाठी महावितरणच्या येलवाडी कार्यालयातील वायरमन गजानन चट्टे याने ठेकेदाराकडे तब्बल 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.
ठेकेदाराने या लाचखोरीबाबत थेट पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठेकेदाराकडून 2 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना गजानन चट्टे याला पथकाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कडक गुन्हा दाखल करून चट्टे याला जेलची हवा खावी लागली होती.
सदर प्रकरणात अटकेत असलेल्या गजानन चट्टे याच्या वतीने वडगाव मावळ येथील विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या वतीने नामवंत विधिज्ञ ॲड. भागवत तोरणे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी कायद्यातील तांत्रिक बाबी आणि वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडली.
दरम्यान, बुधवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले साहेब आरोपी गजानन चट्टे याला अटी व शर्ती घालत जामीन मंजूर केला. या कायदेशीर लढाईत आरोपी तर्फे ॲड. सौरभ दाभाडे, ॲड. भावना शुक्ला, ॲड. मीनाक्षी चव्हाण आणि खेडकर काका यांनी कायदेशीर सहकार्य केले. या जामीन मंजुरीची सध्या खेड आणि मावळ परिसरात चर्चा रंगली आहे.







