पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर भविष्यात उद्भवणारी भीषण वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी विधानसभेत एक महत्त्वाची मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी पुणे-दौंड रेल्वे मार्गाला ‘उपनगरीय’ (Suburban) दर्जा देऊन, त्यावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली. महामार्गावर सुरू होणाऱ्या मोठ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर, प्रवाशांसाठी रेल्वे हाच सर्वात सुरक्षित आणि वेगवान पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार कुल यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, पुणे-सोलापूर आणि पुणे-अहिल्यानगर रस्त्यांच्या कामासाठी शासनाने अनुक्रमे 5,500 कोटी आणि 7,500 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. ही कामे पूर्ण होईपर्यंत पुढील 2 ते 4 वर्षांत महामार्गावर प्रचंड गर्दी वाढणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केवळ रस्ते विकास पुरेसा नसून, समांतर धावणाऱ्या पुणे-दौंड रेल्वे लाईनचा जास्तीत जास्त वापर करणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे रस्त्यावरील वाहनांचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

या प्रश्नावर ठोस उपाय म्हणून त्यांनी काही मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत. यामध्ये पुणे-दौंड मार्गाला तात्काळ उपनगरीय रेल्वेचा दर्जा देणे आणि तिथे EMU लोकल सेवा सुरू करणे यांचा समावेश आहे. सध्या धावणाऱ्या मेमू (MEMU) आणि डेमू (DEMU) गाड्यांच्या डब्यांची संख्या ८ वरून वाढवून १२ करावी, तसेच महिला व दिव्यांगांसाठी विशेष डब्यांची सोय उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत स्वतंत्र लोकल सुरू होत नाही, तोपर्यंत गर्दीच्या वेळी गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे, याची आठवण करून देत आमदार कुल यांनी राज्य सरकारला या प्रस्तावाचा केंद्रीय स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे आवाहन केले. या रेल्वे सुविधेमुळे दौंड, पाटस, कुरकुंभ, केडगाव आणि यवत परिसरातील हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांचा रोजचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.






