पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. अवघ्या १६ दिवसांत तपास पूर्ण करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करणाऱ्या पवार यांनी हा निकाल एका आईच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयमाला पवार म्हणाल्या, “मी जरी वर्दीत असले तरी मी देखील एक आई आहे. मी आज जे काही बोलतेय ते एक आई म्हणून बोलतेय. त्या तीन वर्षांच्या लहान बाळाला काहीही कळत नव्हतं. त्या मुलीला फूस लावून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे आज कुठेतरी त्या चिमुरडीला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.”

तपासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा सिद्ध करणे हेच सर्वात मोठे आव्हान होते. “या प्रकरणाचा तपास महत्त्वाचा होता. गुन्हा सिद्ध करणं हे आमच्यासमोर मोठं आव्हान होतं,” असे त्या म्हणाल्या.
आरोपीच्या वर्तनावर भाष्य करताना विजयमाला पवार यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “या भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. ती एक विकृती आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी त्यांनी समाजालाही महत्त्वाचा संदेश दिला. “समाजात हा संदेश जाणं गरजेचं आहे की पोलीस खातं आणि गृह खातं सक्षम आहे,” असे सांगत अशा गुन्ह्यांमध्ये कठोर आणि जलद तपास करून दोषींना शिक्षा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, न्यायालयाने भीमराव कांबळे याला दोषी ठरवले असून त्याला २९ जून रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणातील शिक्षेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






