लोणी काळभोर, ता. २५ : अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे आदेश असतानाही, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटल व हडपसर येथील विलो पुनावाला या दोन धर्मादाय रुग्णालयांनी डिपॉझिट न भरण्याचे कारण दाखवत उपचार करण्यास नकार दिल्याने, धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकरी महिलेला आपला जीव गमावल्याची घटना मंगळवारी (ता.२३) उघडकीस आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, उपचारासाठी पैसे नसल्याने संबंधित महिलेला तिच्या नातेवाईकांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र ससून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी कागद तयार करण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी घेतल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी पुणे प्राईम न्यूजशी बोलताना केला आहे. विशेष बाब म्हणजे, रुग्णाच्या नातेवाईकांनी ज्या दोन रुग्णालयांवर डिपॉझिट भरल्याशिवाय उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. ती विश्वराज हॉस्पिटल व विलो पुनावाला ही दोन रुग्णालये धर्मादाय अंतर्गत रुग्णालय येतात. या दोन्ही रुग्णालयांनी महिलेवर उपचार केला असता तर ती महिला कदाचित वाचली असते.

सुजाता गोरख लोहार (वय ३०, रा. बामणी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला तात्काळ दाखल करून तो स्थिर होईपर्यंत आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे रुग्णालयांचे कायदेशीर आणि नैतिक कर्तव्य आहे. मात्र या प्रकरणात तसे झाले नसल्याचा आरोप होत असून राज्यातील धर्मादाय आणि सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दौंड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी कळसे व त्यांचे कुटुंबीय लग्नसमारंभ आटोपून धाराशिवहून पुण्याकडे परत येत होते. २३ जून रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास कुरकुंभजवळ त्यांच्या टेम्पोतील डिझेल संपल्याने वाहन महामार्गाच्या कडेला पार्किंग लाईट सुरू ठेवून उभे करण्यात आले होते. यावेळी टेम्पोच्या मागे उभ्या असलेल्या मनीषा चाफेकर आणि सुजाता लोहार यांना भरधाव वेगाने आलेल्या एमएच-१२ व्हीटी-१८७१ क्रमांकाच्या टाटा ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात मनीषा चाफेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुजाता लोहार गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या हातावरून ट्रकचे चाक गेल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या.
सुजाता लोहार यांना तातडीने दौंड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याकडे पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, तेथे केवळ प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर त्यांना विलो पूनावाला रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे ५० हजार रुपयांची डिपॉझिट रक्कम जमा केल्याशिवाय उपचार सुरू करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अखेर सुजाता लोहार यांना मंगळवारी (ता. २३) सकाळी सुमारे दहा वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यावर सुमारे साडेचार तासांनंतर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि सायंकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, विश्वराज हॉस्पिटल आणि विलो पूनावाला ही धर्मादाय रुग्णालये असूनही आर्थिक अटी पुढे करून उपचारात विलंब करण्यात आला, तसेच ससून रुग्णालयातही वेळेत उपचार न मिळाल्याने सुजाता लोहार यांचा जीव गेला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. “रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर असताना प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. अशा वेळी उपचाराऐवजी आर्थिक अटी पुढे करण्यात आल्याने अमूल्य वेळ वाया गेला,” असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार का?
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुजाता लोहार यांचा जीव वेळेत आणि योग्य उपचार मिळाले असते तर वाचू शकला असता का? या प्रश्नाचे उत्तर आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील संवेदनशीलतेचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम ४१ (क) नुसार धर्मादाय रुग्णालयांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणे तसेच मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देणे बंधनकारक आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या योजनेतील अटी व तरतुदींचे पालन करणेही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर एखाद्या गंभीर जखमी रुग्णाला तातडीचे उपचार देण्याऐवजी आर्थिक अटी घालण्यात आल्या असतील, तर संबंधित धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई होणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
“कुरकुंभ अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविणे हे प्रत्येक रुग्णालयाचे कर्तव्य आहे. आर्थिक कारणे पुढे करून उपचार नाकारणे हा अत्यंत गंभीर आणि मानवी मूल्यांना काळिमा फासणारा प्रकार आहे. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलने डिपॉझिटशिवाय उपचार करण्यासाठी नकार दिल्याच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आल्या आहेत. “या संपूर्ण प्रकरणाची आरोग्य विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि राज्य शासनाने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी. तसेच संबंधित धर्मादाय रुग्णालयांनी वर्षभरात किती गरजू रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार दिले, याची माहिती जाहीर करावी. या प्रकरणाबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात येणार असून, संबंधित रुग्णालयांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे,”
-जनार्दन दांडगे (कार्याध्यक्ष – प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य)







