पुणे: पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या कथित हत्याप्रकरणानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना, मेघालयातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील त्यांच्या कुटुंबीयांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. केतन अग्रवाल आणि राजा रघुवंशी या दोन्ही प्रकरणांमध्ये नियोजनाची पद्धत आणि गुन्ह्याचे स्वरूप साम्य असल्याचे सांगत त्यांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे.

राजा रघुवंशी यांची आई उमा रघुवंशी यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमला जामीन मिळाल्यामुळेच सिया गोयलला तिचा होणारा पती केतन अग्रवाल याची हत्या करण्याची हिंमत मिळाली. सोनमला जामीन मिळाला नसता, तर कदाचित पुण्यातील ही घटना घडली नसती. सोनमला मिळालेला जामीन सियासाठी एक प्रकारे प्रेरणा ठरला.”

त्या पुढे म्हणाल्या, “अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि न्यायव्यवस्थेने आता अधिक कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.”
दरम्यान, राजा रघुवंशी यांचा भाऊ सचिन रघुवंशी यांनी केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
“केतन हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जर सियाला हे लग्न करायचे नव्हते, तर तिने स्पष्ट नकार द्यायला हवा होता. खुनासारखा मार्ग स्वीकारण्याची काहीच गरज नव्हती,” असे सचिन रघुवंशी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “सियाला तिच्या पसंतीचा जोडीदार हवा होता, पण केतनही कोणाचा तरी मुलगा आणि भाऊ होता, हे तिने लक्षात घ्यायला हवे होते. आज त्याच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल, याची केवळ कल्पनाच करता येते.”
राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा उल्लेख करत सचिन यांनी सांगितले की, “जर आधीच्या प्रकरणात कठोर कारवाई झाली असती, तर कदाचित अशा घटना पुन्हा घडल्या नसत्या.”
यावेळी त्यांनी केतनच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी पुण्यात येण्याची शक्यताही व्यक्त केली. “अशा दुःखातून आम्ही स्वतः गेलो आहोत. त्यामुळे पीडित कुटुंबाच्या वेदना आम्ही समजू शकतो,” असे ते म्हणाले.
कायदा आणि न्यायव्यवस्थेवर भाष्य करताना सचिन रघुवंशी म्हणाले, “‘कायदा आंधळा असतो’ ही म्हण मी पूर्वी ऐकत होतो, पण आता मला तिचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे.”
दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर कट रचून लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.






