मुंबई: मुंबईमध्ये लग्नाच्या नावाखाली एका NRI ची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला विवाह संकेतस्थळावरून (Matrimonial Site) ओळख झालेल्या महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल 16 लाख रुपयांना गंडा घातला. या फसवणुकीप्रकरणी डी.एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेचा शोध सुरू आहे.

काही काळापूर्वी घटस्फोट झालेल्या तरुणाला पुन्हा नवीन सुरुवात करून लग्न करायचे होते. त्याने एका मॅट्रिमोनिअल साइटवर स्वतःची नोंदणी केली, जिथे त्याची ओळख संबंधित महिलेशी झाली. तिने आपण घटस्फोटित असल्याचे सांगून तरुणाचा विश्वास जिंकला. दोघांमधील ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर ब्रिटनमध्ये या दोघांचा साखरपुडाही पार पडला.

लग्नाची तयारी सुरू असतानाच, महिलेने वेगवेगळ्या कारणांसाठी तरुणाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यामध्ये व्हिसा, विमान प्रवासाचा खर्च आणि वैयक्तिक गरजांचा समावेश होता. याशिवाय, तिने तरुणाकडून अनेक महागड्या भेटवस्तूही घेतल्या. सुरुवातीला तरुणाने तिला मदत केली, पण तिची पैशांची मागणी दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्याला संशय आला.
तरुणाने स्वतःहून महिलेची चौकशी केली असता, त्याला एका ओळखीच्या व्यक्तीकडून धक्कादायक माहिती मिळाली. या महिलेने यापूर्वीही अनेक तरुणांना अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून फसवले होते. तसेच, ती मुंबईत एका दुसऱ्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचेही स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांत धाव घेतली.
महिलेने लग्नाचे नाटक करून तरुणाच्या मेहनतीचे 16 लाख रुपये लुटले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून महिला आणि तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.







