लोणावळा, ता. 01 : महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या तीन कर्मचाऱ्यांनी पोलिस असल्याचे भासवून पर्यटकाला कारवाईची धमकी देत ऑनलाइन एक हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता. 01) उघडकीस आला. खंडाळा एक्झिट परिसरात हा प्रकार घडला. पर्यटकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निलेश अशोक साळुंखे, रोहिदास बदाम पाटील व राजेश सूर्यकांत केंद्रे (पूर्ण पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत विक्रमसिंह मोतीसिंह रघुवंशी (वय ३३, रा. कल्याण, मूळ रा. भोपाळ, मध्य प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमसिंह रघुवंशी गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पत्नीसह रॉयल एनफिल्ड बुलेटवरून खंडाळा एक्झिट येथून जात होते. यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी निलेश साळुंखे, रोहिदास पाटील आणि राजेश केंद्रे यांनी त्यांना अडवले.

तुम्ही चारचाकी वाहनांच्या मार्गावरून दुचाकी चालवत आहात, येथे दुचाकींना बंदी आहे, असे सांगून संबंधितांनी सहा हजार रुपये दंड, वाहन जप्ती आणि वाहनचालक परवाना निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी तडजोड करून अमोल गणपत डोके यांच्या ऑनलाइन क्यूआर कोडवर एक हजार रुपये जमा करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मात्र, आपल्याकडून पैसे घेणारे पोलिस नसल्याचा संशय आल्याने रघुवंशी यांनी स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. संबंधित व्यक्ती महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तात्काळ 112 क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे करीत आहेत.
पर्यटकांना पोलिसांचे आवाहन
लोणावळा आणि खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी रस्त्यावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला रोख रक्कम किंवा ऑनलाइन स्वरूपात दंड देऊ नये. अशा प्रकारची घटना घडल्यास तातडीने 112 क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






