पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयात एका पोलीस हवालदाराला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सुभाष साळुंखे (वय 32), कुशल नैना गोयल (वय 28) आणि सोहेल शब्बीर शेख (वय 27, सर्व रा. पिंपळे गुरव) हे तिघे त्यांचा मित्र कौस्तुभ गुप्ता याला उपचारासाठी YCM रुग्णालयात घेऊन आले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णालयात तैनात असलेले पोलीस हवालदार अमोल सुरेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीचा राग आल्याने आरोपींनी थेट पोलीस हवालदाराशीच हुज्जत घातली. त्यांनी शिंदे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि गच्ची धरून बाजूला ढकलले. इतकेच नव्हे तर, हातातील जाड लोखंडी कड्याने शिंदे यांच्या पायावर व डोळ्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी जखमी पोलीस हवालदार अमोल शिंदे यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. संत तुकारामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






