पुणे : पुण्यातील प्रसिद्ध जे. एम. रोड खाऊ गल्ली आणि परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेसह स्वच्छता आणि परवाना नियमांची तपासणी करण्यासाठी 18 नोव्हेंबर 2026 रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली. या तपासणीत अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळून आले.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत पुणे विभागाच्या झोन-02 पथकाने ही मोहीम राबवली. जे. एम. रोड खाऊ गल्ली, जंगली महाराज मंदिरासमोरील खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे आणि एन.सी.आर. हॉटेल परिसरातील एकूण 17 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत वैध अन्न परवाना किंवा नोंदणी नसतानाही व्यवसाय सुरू असल्याचे आढळलेल्या 8 आस्थापनांना तातडीने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या प्रत्येक आस्थापनावर 30,000 रुपयांप्रमाणे एकूण 2 लाख 40 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

याशिवाय, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या 6 आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित करण्यात आली. तर नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अन्य 2 आस्थापनांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि संबंधित नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली.
कारवाई झालेल्या 8 आस्थापनांमध्ये श्रीनाथ पिझ्झा अँड सँडविचेस, राज चायनीज फास्ट फूड, हिंदवी स्वराज्य, एव्हरेस्ट मोमोज, जय मल्हार भुर्जी सेंटर, शोरमा सेंटर, उत्कर्ष मंडळ लव्ह ज्यूस पॉईंट आणि साई ज्यूस, मिल्कशेक अँड सरबत सेंटर यांचा समावेश आहे.






