मुंबई : देशात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, लहान दुकानदारांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेक जण UPI च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करतात. अशातच व्यापाऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकणारा एक महत्त्वाचा प्रस्ताव समोर आला आहे. व्यापाऱ्यांमधील म्हणजेच B2B व्यवहारांवरील शुल्क कमी करण्याचा विचार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करत आहे.

या प्रस्तावानुसार, B2B UPI व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारामागे केवळ 5 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे, व्यवहाराची रक्कम 10 हजार रुपये असो किंवा लाखांच्या घरात, शुल्क मात्र समान ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे मोठ्या रकमेचे डिजिटल पेमेंट करणाऱ्या व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच्या शुल्क रचनेनुसार, 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या काही व्यापारी UPI व्यवहारांवर 0.4 टक्के MDR शुल्क आकारण्याची तरतूद होती. या शुल्कासाठी कमाल मर्यादा 300 रुपये निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर व्यापाऱ्यांना अधिक पैसे खर्च करावे लागू शकत होते.

या बदलाचा फायदा घाऊक विक्रेते, किरकोळ दुकानदार आणि ऑनलाइन B2B व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहारांचा खर्च कमी झाल्यास व्यापाऱ्यांना UPI चा वापर अधिक सोयीस्कर वाटू शकतो. मात्र, हा अद्याप प्रस्ताव असून नवीन शुल्क कधीपासून लागू होणार, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.






