भिगवण, ता. 19 : शिंगणापूरला जाण्यासाठी गाडी, चालक आणि पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून जावयाने सासऱ्यावर लोखंडी त्रिशूळाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील अकोले येथील धायगुडेवस्तीवर घडली. या हल्ल्यात सासरे भानुदास तुकाराम धायगुडे (वय 56) यांच्या पोटाला व मानेवर दुखापत झाली असून, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलाच्या हनुवटीला त्रिशूळ लागून तोही जखमी झाला आहे. याप्रकरणी जावई अमर सोमनाथ कांबळे (वय 36, मूळ रा. धाराशिव) याच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायगुडे हे कुटुंबासह अकोले येथील धायगुडेवस्तीवर राहतात. त्यांची मुलगी आणि जावई ऑक्टोबर 2024 पासून त्यांच्यासोबत राहत आहेत. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अमर कांबळे याने शिंगणापूरला जाण्यासाठी गाडी, चालक आणि पैशांची मागणी केली. मात्र, रात्रीच्या वेळी गाडी व चालक मिळणे शक्य नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व व्यवस्था करून देतो, असे सासरे धायगुडे यांनी सांगितले.
याचा राग आल्याने कांबळे याने शिवीगाळ व दमदाटी करत जवळील सुमारे दोन फूट लांबीच्या लोखंडी त्रिशूळाने सासऱ्याच्या पोटावर वार केला. त्यानंतर मानेवरही त्रिशूळाने प्रहार करून त्यांना खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा जीवन धावून आला असता, झटापटीत त्याच्या हनुवटीला त्रिशूळ लागून तोही जखमी झाला. यावेळी पुतण्या सुमित धायगुडे तसेच शेजारी संजय कोकरे आणि तुषार कोकरे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले. या घटनेप्रकरणी भिगवण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.







