पुणे, ता. १९ : पुणे-नगर महामार्गावर चास (जि. अहिल्यानगर) गावाजवळ दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला. बुधवारी (ता. १८) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथून पंकज ट्रान्सपोर्टचा (एमएच ४६ बीएम ४८५४) कंटेनर कॉइल घेऊन नांदेडच्या दिशेने निघाला होता. पुणे-नगर महामार्गावरून जात असताना चास गावाजवळ अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी चालकाने आपत्कालीन ब्रेक लावला. मात्र, अचानक ब्रेक लावल्याने कंटेनरचे संतुलन बिघडले आणि तो रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. चालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.







